मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीला लवकरच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे कवच मिळणार आहे. हे क्षेपणास्त्र रडारशी संलग्न असेल. या संबंधीच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
२६/११ च्या हल्ल्यानंतर किनारपट्टीवर स्वयंचलित ओळख प्रणाली (एआयएस) लावण्याचा निर्णय झाला. त्याअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगराशी संबंधित किनारपट्टीवर असे जवळपास २० एएआय बसविण्यात आले आहेत. त्याआधारे येणारी प्रत्येक बोट किंवा होडी ओळखता येते. तर खोल समुद्रातील संशयित हालचाली ओळखण्यासाठीही देशभरात एकूण ५७ रडार किनारपट्टीवर बसविण्याचा निर्णय झाला. त्यापैकी ४१ रडार सध्या बसविण्यात आले आहेत. ४१ पैकी १० रडार पश्चिम किनारपट्टीवर आहेत. त्यातील चार रडार मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीवर (त्यांची नेमकी जागा सुरक्षेच्या कारणामुळे लपविण्यात आली आहे) आहेत. याच रडारला आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र संलग्न असतील.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संरक्षण खरेदी परिषदेची (डीएसी) बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये त्यांनी ही क्षेपणास्त्र प्रणाली सर्व किनारपट्ट्यांवर बसविण्यास मंजुरी दिली. ‘नेक्स्ट जनरेशन मेरिटाइम मोबाइल कोस्टल बॅटरीज’ असे नाव असलेला हा जवळपास १३५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यामध्ये किनारपट्टीवर बसविण्यात आलेल्या रडारने शत्रूचे जहाज टिपल्यास तत्काळ ‘ब्रह्मोस’ हे आवाजाच्या वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र डागले जाईल. क्षेपणास्त्राला रडारकडूनच लक्ष्याची सूचना दिली जाईल. त्यामुळे ते अचूक मारा करू शकेल.
