राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो मात्र मुंबईतील एचआर,जयहिंद व केसी कॉलेजसह इतर नामांकित कॉलेजमध्ये हा कोटा तेवढे विद्यार्थी उपलब्ध होत नाही म्हणून शिक्षण उपसंचालकांशी संगनमत करून उर्वरित कोटयात घोटाळा केला जात असल्याची गंभीर माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. दरम्यान धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीनंतर या प्रवेश घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिली.
मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित महाविद्यालयात अल्पसंख्यांक कोट्यातील फक्त ५ ते १० टक्के प्रवेश त्या त्या भाषिक अल्पसंख्याकातून करण्यात येतात तर उर्वरित ४० ते ४५ टक्के प्रवेश हे आर्थिक देवाणघेवाण करुन प्रती विद्यार्थी ४ ते ५ लाख घेवून प्रवेश करण्यात येत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मुंबईतील एचआर कॉलेजमध्ये ९०० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे तर जयहिंदमध्ये १२०० आणि केसी कॉलेजमध्ये १३५० एवढी क्षमता आहे. मात्र संबंधित विभागाकडून राखीव ५० टक्के कोट्यातील जागा शिल्लक राहिल्यास शासनास प्रत्यार्पित करतात असे निवेदन सरकारकडे करण्यात आले आहे परंतु ही वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे धनंजय मुंडे यांनी समोर आणले. दरम्यान शासनाची दिशाभूल करुन अल्पसंख्यांकांच्या राखीव जागेवर आर्थिक व्यवहार करुन प्रवेश देणार्या महाविद्यालयांवर व शिक्षण उपसंचालकावर गुन्हे दाखल करावा व संबंधित महाविद्यालयांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्यात यावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. या प्रवेश घोटाळ्याची केस टू केस चौकशी करणार असल्याचे तसेच यावर्षी एकही ऑफलाईन प्रवेश होणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
