देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तिथे सुषमा यांनी प्राणज्योत मालवली. सुषमा यांच्यासोबत त्यांचे पती व कुटुंबातील अन्य सदस्य होते. सुषमा बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं.
सुषमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
