माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. जेठमलानी यांनी ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्षपदही भूषविले होते.
जेठमलानी यांचा ब्रिटिश राजवटीतील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे १४ सप्टेंबर १९२३ या दिवशी जन्म झाला. ते वयाच्या १८ व्या वर्षी वकील बनले. शाळेत शिकत असताना बढती मिळवत वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण केले. त्या काळात सर्वसाधारणपणे लोक वयाच्या २१ व्या वर्षी वकील बनत असत. मात्र जेठमलानी यांनी ही कमाल १८ व्या वर्षीच करून दाखवली. ही माहिती स्वत: जेठमलानी यांनी सन २००२ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली होती.
