गेल्या महिन्यात आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ९ हजार ५४२ घरे पूर्णपणे कोसळली. यामुळे संबंधित कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याशिवाय ३१ हजार ४९२ घरांची पडझड झाली आहे. महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणेतर्फे केलेल्या पंचनाम्यातील अंतिम अहवालातून हे चित्र समोर आले आहे. दरम्यान, या घरांच्या पुर्नबांधणीसाठी अनुदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५४ कोटी ६५ लाखांची मागणी जागतिक बँकेकडे केली आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील महापुरामुळे हातकणंगलेतील पाच, शिरोळ तालुक्यातील १८, गगनबावड्यातील एक, करवीर तालुक्यातील तीन अशी २७ गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. या गावांतील मातीची सर्व घरे जमीनदोस्त झाली. याशिवाय ३१८ गावे पूर आणि अतिवृष्टीने बाधित झाली होती. या गावांतील घरांची मोठ्या संख्येने पडझड झाली. शहरातील अनेक वसाहतीमध्ये पंचगंगा नदीचे पाणी घुसले. येथीलही खापऱ्यांची घरे पूर्णपणे पडली आहेत. शहरातील आणि गावनिहाय पडझडीचा पंचनामा प्रशासनातर्फे करण्यात आला. प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा केल्यानंतर ३१ हजार ४९२ घरांची पडझड तर ९ हजार ५४२ घरे पूर्णपणे कोसळली असल्याचे स्पष्ट झाले.
