सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण होऊन ती सातव्या क्रमांकावर आली आहे. जागतिक बँकेनं जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०१८ मधील आकडेवारीनुसार, जीडीपीच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या स्थानी आहे. तर ब्रिटन आणि फ्रान्सनं भारताला मागे सारत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. २०१७साली भारतानं फ्रान्सला मागे टाकलं होतं. मात्र यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची पिछेहाट झाली आहे. पुढील पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं ध्येय गाठू असा विश्वास व्यक्त करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
जीडीपीच्या बाबतीत अमेरिकी अर्थव्यवस्था अव्वल स्थानी आहे. आर्थिक वर्ष २०१८मध्ये अमेरिकेचा जीडीपी २०.५ ट्रिलियन डॉलर आहे. अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानी चीन आहे. चीनचा जीडीपी १३.६ ट्रिलियन डॉलर इतका असून, पाच ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटन आणि फ्रान्स २.८ ट्रिलियन डॉलर जीडीपीसह या यादीत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहे. तर सातव्या स्थानी घसरण झालेल्या भारताचा जीडीपी २.५ ट्रिलियन डॉलर आहे.
