पनवेल मधील भाजपाच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात माजी नगरसेविका कल्पना राऊत या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्राचीन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताला जबाबदार असलेल्या स्विफ्ट डिझायर कार चालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे आणि माजी नगरसेविका कल्पना राऊत या दोघी गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील प्राचीन हॉस्पिटल समोरील रस्त्यालगत उभ्या होत्या. याचवेळी त्या ठिकाणावरुन जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार चालक महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सदर कारची धडक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नगरसेविका मुग्धा लोंढे आणि कल्पना राऊत या दोघींना बसली. या अपघातात नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कल्पना राऊत या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ प्राचीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रचारात असलेले आमदार प्रशांत ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे नगरसेवक नितीन पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन म्हाडाचे कोकण विभागीय सभापती बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले.
