शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळं मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.
शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर आज, बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरं प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. पुढील काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार आहे. अधिकाऱ्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असंही ते म्हणाले. ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील, असंही ते म्हणाले.
