पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून सायंकाळी सहा वाजल्यापासून शहर आणि परिसरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

कसोटी सामन्यावर पावसाचे सावट
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात असलेल्या गहुंजे स्टेडियमवर उद्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू होत आहे. या सामन्याला पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील काही भागांत पुढील चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
