रखडलेले रेल्वे प्रकल्प, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस एकाच मार्गिकेतून धावत असल्याने लोकल खोळंबणे आणि रेल्वे फाटकांबाबत स्थानिक प्रशासनाचे उदासीन धोरण यांमुळे मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा ठाणे-दिवा पाचवी व सहावी मार्गिका हा महत्त्वाचा प्रकल्प रखडत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत, म्हणजे पुढील किमान नऊ महिने जलद मार्गावरील लोकल सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबानेच धावतील.
२००८ मध्ये मंजूर झालेली ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका अद्याप तयार झालेली नाही. यामुळे ठाणे ते दिवा दरम्यान मेल-एक्स्प्रेस, अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल एकाच मार्गिकेतून धावतात. याचा फटका जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांना बसतो. ठाणे-दिवा प्रकल्प पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत जलद मार्गावरील प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागणार असल्याचे रेल्वे अधिकऱ्यांनी सांगितले.
‘ठाणे-दिवा’ प्रकल्पातील कळवा आणि मुंब्रा स्थानकातील अतिरिक्त फलाटांचे ८५ टक्के काम झाले आहे. पुलाच्या कामांसाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर पुलावरील गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येईल. मार्चअखेर रुळांच्या यार्ड जोडणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याण स्थानकातून मेल-एक्स्प्रेस क्रॉस होताना अतिरिक्त मार्गिका नसल्याने स्थानकाबाहेरच लोकल थांबवावी लागते. हे टाळण्यासाठी कल्याण यार्डाचा नूतनीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. कसारा आणि कर्जतहून सुटणाऱ्या लोकल वेळेत सीएसएमटीसाठी रवाना होतात. मात्र कल्याण स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी थांबत असल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
