सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून आता भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तींच्या काळात तसेच दंगल आणि जाळपोळीसारख्या मानवनिर्मित घटनांमुळे होणाऱ्या वाहनांच्या हानी वेगळे विमाछत्र उपलब्ध होणार आहे. विमा नियामक ‘इर्डा’ने सर्वसाधारण विमा कंपन्यांना येत्या एक सप्टेंबरपासून नव्याबरोबरच जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठीही अशा पद्धतीचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
‘इर्डा’ने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात थोडा बदल करून येत्या एक सप्टेंबरपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी एकरकमी पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक असणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भूकंप, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच दंगल आणि जाळपोळीसारख्या घटनांमध्ये होणाऱ्या नुकसानापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी (ओन डॅमेज) खरेदी करण्यात येणारी विमा पॉलिसीही घेणे ऐच्छिक करण्यात आले आहे. ‘इर्डा’च्या नव्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार ‘सर्व विमा कंपन्यांनी १ सप्टेंबर २०१९पासून नव्या आणि जुन्या कार तसेच, दुचाकी वाहनांसाठी ओन डॅमेजपासून संरक्षण देणारी विमा पॉलिसी सादर करणे आवश्यक आहे. ही पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकाच्या विनंतीनुसार आग आणि चोरीपासून झालेले नुकसानही भरून काढता येणार आहे.’ या विशेष पॉलिसीव्यतिरिक्त वेगळे पॅकेजही सादर करण्याचा पर्याय कंपनीला मिळणार आहे. त्यानुसार थर्ड पार्टीचेही नुकसान भरून काढण्यात येणार आहे.
