पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला तपास यंत्रणांनी मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा होते. ही संपूर्ण रक्कम गोठवण्यात आली आहे.
स्विस बँकेने याबाबतचं एक निवेदन जारी केलं आहे. भारताच्या मागणीनंतर नीरव मोदीची बँक खाती गोठवण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात तपास यंत्रणांना आलेलं हे दुसरं यश आहे. याआधी या घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचं वृत्त आलं होतं. आम्ही चोक्सीचं नागरिकत्व रद्द करत आहोत, असं अँटिगुआच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं.
