डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयानं त्यांची जामीनावर सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (वय २८), डॉ. अंकिता खंडेलवाल (वय २७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
२३ जुलै रोजी न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब केली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी न्यायालयानं सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली होती. न्यायालयात आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली.
