आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचं आज रात्री साडे नऊच्या सुमारास निधन झालं. त्यांचं पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. डॉ.लागू यांनी तब्बल चार दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी शंभरहून अधिक हिंदी सिनेमात आणि ४० हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. तसेच २० हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं, वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती. त्यांनी भालबा केळकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. पण वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कॅनडा आणि इंग्लंडला जावं लागलं. १९६०च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुण्यातील पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि मुंबईतील रंगायन या संस्थेद्वारे त्यांचे रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता, ध्यासपर्व, सुगंधी कट्टा सारख्या अनेक चित्रपटांतून काम करत मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण केला. पिंजरा, सिंहासन आणि मुक्तामधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
