आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तिहार तुरुंगात पोहोचल्या आहेत. त्यांच्या या अचानक भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
चिदंबरम हे गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. मनमोहन सिंग व सोनिया गांधी हे दोघे आज त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. काँग्रेस पक्ष चिदंबरम यांच्या सोबत आहे, असा संदेश या भेटीतून देण्याचा सोनियांचा उद्देश आहे. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम हेही त्यांच्यासोबत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील पराभव, राहुल गांधी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा व चिदंबरम यांच्यासारख्या नेत्याच्या अटकेनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेल्याची दिसत होती. मात्र, सोनियांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध राज्यांत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पक्षाला लढण्याच्या स्थितीत आणण्याचा सोनियांचा प्रयत्न आहे. चिदंबरम यांची भेट हा याचाच भाग असल्याचं बोललं जात आहे.
