दहा कोटींच्या खंडणीसाठी संगमनेरातून शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढल्याने खंडणीखोरांनी मुलाला शहराजवळील खेड्यात सोडून दिले. पोलिसांनी याप्रकरणी चौघा आरोपींना अटक केली आहे.
संगमनेर येथील कटारिया क्लॉथचे संचालक मनोज कटारिया यांचा मुलगा दक्ष (वय-१२ वर्ष) हा ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिकण्यास आहे. सकाळीच तो नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर स्कूलबसची वाट पाहत असताना इंडिकामधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला उचलून इंडिकामध्ये टाकले व तेथून पलायन केले. काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करत अपहरण केल्याचे सांगितले.
घाबरलेल्या पालकांनी शाळेत व बसचालकाकडे चौकशी केली असता मुलगा शाळेत आला नसल्याची माहिती त्यांना समजली. त्यामुळे त्यांनी लगेचच ही माहिती पोलिसांना दिली. दरम्यानच्या काळात अपहरणकर्त्यांनी मेसेजद्वारे त्यांच्याकडे दहा कोटीची खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास सुरू केला. मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस संशयितांपर्यंत पोहचल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी मुलाला संगमनेरनजीक सुकेवाडी येथे सोडून दिले.
