भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. गस्त, गार्ड, पोस्ट ड्युटी यांसारखी जबाबदारी तो सांभाळणार असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून गुरूवारी देण्यात आली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ’31 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या काळात लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनी 106 टी.ए.बटालियनमध्ये सामील होणार आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या युनिटची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात असणार आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग(गस्त) गार्ड आणि पोस्ट ड्युटी यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळेल आणि सैनिकांसोबतच राहील’.
धोनीमुळे युवकांमध्ये लष्करात दाखल होण्याबद्दल एक जागरुकता निर्माण होणार असून धोनीलाही तेच हवे आहे असे सूत्रांनी सांगितले. पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. २०११ सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. अभिनव बिंद्रा आणि दीपक रावसोबत धोनीला हे पद देण्यात आले होते. २०१५ साली धोनीने आग्रा येथे पॅराशूट जंपिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. पॅराशूट रेजिमेंट लष्कराची स्पेशल फोर्स आहे.
