नवी मुंबईत कळंबोली येथील न्यू सुधागड शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कमी तीव्रतेचा स्फोट घडवून, धनिक लोकांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार या तिघांनी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुण्यातील कोंढवा येथून एकाला तर उलवे येथून अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
न्यू सुधागड शाळेजवळ १६ जून रोजी एक संशयास्पद पेटी आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या पेटीची पडताळणी केली असता त्यात कमी तीव्रतेचा बॉम्ब आढळून आला होता. त्यामुळे मोठी दहशत माजली होती. याप्रकरणी एटीएस व नवी मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास करण्यात आला. त्यात याचा संबंध कोणत्याही दहशतवादी संघटनेशी नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना आता यश आलं असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दीपक दांडेकर (५५) हा याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याला उलवेजवळच्या कोंबडभुजे गावातून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सुशील साठे (३५) या साथीदाराकरवी दीपकने बॉम्ब प्लांट केला होता. या दोघांना स्फोटकं व साहित्य मनीष भगतने पुरवले होते. दांडेकर आणि साठे या दोघांनीही आम्ही बॉम्ब प्लांट केल्याची कबुली दिली आहे, असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले. या दोघांनी २ कोटीच्या खंडणीसाठी हे कृत्य केले.
