मुंबईतील एचआयव्हीबाधित विधवा महिलांना मासिक एक हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यामुळं एचआयव्ही बाधित विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळणारे पैसे थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. साधारण दोन ते साडेतीन हजार महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबईत वास्तव्य करणार्या आणि एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या निधनानंतर पत्नीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. एड्समुळे मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या नावाची नोंदणी एसआरटी केंद्रात केलेली असावी. पतीच्या मृत्यूचा दाखला अथवा महापालिकेच्या शासकीय मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे त्यासाठी आवश्यक राहणार आहे.
या योजनेनुसार दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे ईसीएसद्वारे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र, तिच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
