शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातच शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून निवडणूक लढणाऱ्या आमदार तृप्ती सावंत यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सावंत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहेत. जागावाटपाचे गणित उलटे झाल्याने व अनेक ठिकाणी जागांची अदलाबदल झाल्यानं दोन्ही पक्षातील इच्छुकांनी सुमारे पाऊणशे मतदारसंघात बंडाचे निशाण उगारले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. खरंतर युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. मात्र, पक्षानं तेथील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं तृप्ती सावंत नाराज होत्या. अखेरपर्यंत तिकिटासाठी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं अखेर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत सावंत यांचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांनी माघार न घेता प्रचार सुरूच ठेवला. नाशिकमध्ये ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांची पक्षातून तातडीनं हकालपट्टी करण्यात आली होती. राज्यातील अनेक बंडखोरांवरही तत्परतेनं कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, सावंत यांच्यावर कारवाई करण्याचं पक्ष नेतृत्वानं टाळलं होतं. त्यामुळं शिवसैनिकांमध्येही कुजबूज होती. अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळं सावंत यांना बळ देणाऱ्या शिवसैनिकांना योग्य तो संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात बाळा सावंत यांनी मोठ्या हिकमतीनं दोनवेळा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला होता. त्यांच्या निधनानंतर तिथं तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत करून सावंत पुन्हा निवडून आल्या होत्या.
