भारतीय वायुदलाचा विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी लष्करातील कमांडो अहमद खानचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. नियंत्रण रेषेवर झालेल्या धुमश्चक्रीत तो ठार झाला. शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत पाकने गोळीबार केला. भारताने या गोळीबाराला जशास तसे प्रत्युत्तर दिल्याने गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
पाकिस्तानी लष्करातील स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील सुभेदार अहमद खानने अभिनंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा छळ केला होता. फेब्रुवारीमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पिटाळून लावत असताना अभिनंदन विमानातून खाली पडले होते व पीओकेला पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. सुभेदार अहमद खानने अभिनंदन यांचा छळ केला होता. पाकच्या या कमांडरचा १७ ऑगस्ट रोजी नकीयाल सेक्टरमधील गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमद खान भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तो मरण पावला. २७ फेब्रुवारीला अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानकडून जो फोटो प्रसिद्ध करण्यात आला. त्या फोटोत दाढीवाला सैनिक हा अहमद खान आहे.
