दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण रद्द करण्यात आल्यानं अकरावी प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अकरावी प्रवेशात विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
राज्याचे नवे शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरण्यात आले नव्हते. त्यामुळं दहावीचा निकाल कमालीचा घसरला होता. विद्यार्थ्यांची टक्केवारीही कमी झाली होती. त्यामुळं अकरावी प्रवेशात या विद्यार्थ्यांचा सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपुढं टिकाव लागणं अशक्य झालं होतं. या विरोधात सर्वच स्तरांमध्ये नाराजी होती.
