मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरुन बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनीतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दोन मिटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हाधिकाºयांनी पुरस्थितीची पाहणी केली असून वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संततधार पाऊस आणि धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पूर आला आहे. या दोन नद्यांचा संगम बपेरा गावाच्या शेजारी आहे. आंतरराज्यीय पुलावर ५ फुट पाणी असल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला असून शेकडो प्रवासी सिमावर्ती गावात अडकले आहेत. पुराचे पाणी देवरी गावाचे शिवारात शिरल्याने १०० एकरहून अधिक क्षेत्रातील धानाचे पिक गेल्या ४८ तासापासून पाण्याखाली आहेत. गोंडीटोला, सुकडी नकुल, बपेरा, चुल्हाड, परसवाडा या नद्यांच्या काठावरील गावात हीच स्थिती आहे. बावनथडी नदीचे पाणी संगमनजिक अडल्याने नदीला पूर आला आहे. याच नदीवर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याला जोडणारा पूल आहे. या पुलावर ५ फुट पाणी आले आल्याने संपूर्ण वाहतूक बंद आहे.
