महाराष्ट्र अधिवेशन विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील.
शिवसेनेचे सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे , काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण विश्वासदर्शक ठराव मांडतील. आज दुपारी दोन वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल. या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. आज नव्या मंत्र्यांचा परिचयही सभागृहात करून दिला जाईल.
अधिवेशनाच्या उद्याच्या सत्रात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेऊन या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला जाईल. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीची घोषणाही उद्या होणार आहे.