भिवंडी-वाडा महामार्गावरील खड्ड्यांनी बुधवारी रात्री डॉ. नेहा आलमगीर शेख (२३) या तरुणीचा बळी घेतला. खड्डा चुकवताना दुचाकीवरून पडलेल्या नेहाचा समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी कुडूस नाका येथे काही तास रास्ता रोको आंदोलन केले.
वाडा तालुक्यातील कुडूस येथील डॉ. नेहा शेख ही तरुणी ९ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या आपल्या लग्नाची खरेदी करण्यासाठी नातेवाईकांसह बुधवारी ठाणे येथे गेली होती. खरेदी करून ती भावासोबत अॅक्टिव्हावरून कुडूस येथे परतत होती. भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथे खड्डा चुकवताना ती गाडीवरून पडली आणि समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी अनगाव येथील टोलनाक्यावर धडक देऊन रस्ता सुस्थितीत होईपर्यंत टोल बंद करण्याची मागणी करीत टोलनाका बंद पाडला. गुरुवारी सकाळी नेहावर अंतिम संस्कार झाल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको करीत रस्ते कंत्राटदार सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निषेध नोंदवून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.