पंजाब महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये संभ्रम असतानाच, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या अफवा असल्याचं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलंय. सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत, असंही आरबीआयनं सांगितलं.
अर्थ सचिव राजीव कुमार यांनी सांगितलं की, ‘सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले मेसेज चुकीचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकार बळकटी देण्याचे काम करत आहे. बँका बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज चुकीचे आहेत. बँका बंद होणार नाहीत, असं आरबीआयनंही स्पष्ट केलंय.
आरबीआयकडून सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँका कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळं या बँकांच्या खात्यांमधून तुमचे पैसे आताच काढा असं आवाहन या व्हायरल मेसेजमधून करण्यात आले आहे. युको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांसह नऊ बँकांचा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांच्या खात्यांमध्ये तुमचे पैसे असतील तर ते त्वरीत काढा आणि हा मेसेज इतरांनाही पाठवा, असं आवाहनही केलं होतं. मात्र, या अफवा आहेत. बँका बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार बँकांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं अर्थसचिव राजीव कुमार यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं.
