केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘इंडिया स्मार्ट सिटीज अॅवॉर्ड्स’मध्ये ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या सहा प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या सहा प्रकल्पांचे सादरीकरण ‘पुणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र जगताप यांनी नुकतेच दिल्लीत केले.
गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘पुणे स्मार्ट सिटी’ने प्लेसमेंकिंग, पीएमसी केअर, लाइटहाउस आणि ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ अशा चार प्रकल्पांमध्ये पुरस्कार पटकाविले होते. त्यानंतर केंद्र सरकारने यंदा जाहीर केलेल्या स्पर्धेमध्येही देशभरातील ३३ स्मार्ट सिटी शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नऊ प्रकल्पांचा समावेश या स्पर्धेसाठी केला गेला होता. त्यातील सहा प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये स्मार्ट क्लिनिक, स्मार्ट आर्ट वीक, स्मार्ट प्लेसमेकिंग, स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग, स्मार्ट पीएमसी केअर २.० आणि स्मार्ट ई-बस सहा अशा सहा प्रकल्पांचा समावेश झाल्याचे जगताप यांनी सांगितले.
