नेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये काल चौथ्या दिवशी भारतानं यजमानांना मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली. 32 सुवर्ण, 23 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह भारताच्या खात्यात एकूण 68 पदकं जमा झाली आहेत. त्यामध्ये अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांचं मोलाचं योगदान आहे.
नेमबाजीमध्ये अन्नू राज, गौरी शेरन आणि नीरज कुमार यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारातही अन्नू राजनं सुवर्ण तर गौरीनं रौप्य पदक मिळवलं. खो-खो स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघानं सुवर्णपदकं मिळवली. ट्राएथलॉनमध्ये भारतानं फोर बाय फोर मिश्र रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
तायकोवांदो क्रीडा प्रकारात तीन सुवर्णपदकांसह भारतानं सहा पदकांची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये भारतानं सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली. बॅडमिंटनमध्ये आठ भारतीय बॅडमिंटन पटूंनी एकेरी आणि दुहेरी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आठ पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीचे सामने उद्या होणार आहेत.