राजधानी दिल्लीत ३ ते ४ आत्मघातकी दहशतवादी शिरल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. ही माहिती मिळताच काल (बुधवार) रात्रीपासूनच दिल्लीत रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. श्रेणी-अ मधील ही माहिती हाती येताच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने शहरातील अनेक भागांमध्ये छापे टाकले. दरम्यानच्या काळात दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. श्रेणी-अची माहिती ही विश्वसनीय समजली जाते. दिल्लीत रेड अॅलर्ट घोषित झाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्लीत ठिकठिकाणी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
या बाबत सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीत शिरलेले हे आत्मघातकी दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी आहेत. हे दहशतवादी गेल्याच आठवड्यात दिल्ली शहरात शिरले आहेत. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी दिल्लीत मोठा आत्मघाकी हल्ला करण्याची योजना आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत शिरलेल्या दहशतवाद्यांपैकी कमीत कमी दोन दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत.
गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री दिल्लीतील ९ ठिकाणांवर छापे मारले. या दरम्यान दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सीलमपूर आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील आणखी दोन ठिकाणांवरदेखील छापे टाकण्यात आले आहेत. यात जामिया नगर आणि पहाडगंज जवळील मध्य दिल्लीतील २ जागांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी भारतात दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. ‘पाकिस्तानने जर या दहशतवादी गटांना नियंत्रणात ठेवले, तर भारतात होणारा हा संभाव्य हल्ला रोखता येऊ शकतो,’ असेही अमेरिकेने स्पष्ट म्हटले आहे.
