अल अदील ट्रेडिंग चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’ मासिकातर्फे नुकतेच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट २०१८’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. पश्चिम आशियातील आघाडीच्या १०० भारतीय व्यावसायिक नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. दातार यांना २७ वे मानांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी ते याच यादीत ३० व्या स्थानी होते. रीटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
या पुरस्कारांचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. दुबईतील पॅलाझ्झो व्हर्सेस येथे झालेल्या कार्यक्रमात संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) भारताचे राजदूत नवदीपसिंग सुरी व शेख मोहम्मद बिन मक्तुम बिन जुमा अल मक्तुम यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. दातार यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. दातार यांना नुकताच संयुक्त अरब अमिरातीचा दीर्घकालीन खास गोल्डन व्हिसा १० वर्षांसाठी मिळाला आहे. दातार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या अल अदील ट्रेडिंगने ९ हजार भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
