झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान होतं आहे. धनबाद, देवघर, गिरीदीह आणि बोकारो या चार जिल्ह्यातल्या 15 मतदारसंघात आज मतदान होत आहे. बागोदर, जमुआ, गिरीदीह, डुमरी आणि टुंडी या पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालेल. उर्वरित दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालेल.
या टप्प्यात 22 महिलांसह 221 उमेदवार रिंगणात आहेत. राज पालीबार आणि अमर बौरी हे दोन मंत्री, सात माजी मंत्री आणि 14 विद्यमान आमदारांचं भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांमधे केंद्रीय निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
हवाई देखरेखीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात आहेत. बिहार आणि पश्चिम बगालच्या सीमेलगतच्या भागातून घुसखोरी रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. 2 हजार 122 मतदान केंद्रांवर ऑनलाईन देखरेख ठेवली जाईल असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी सांगितलं. देशात प्रथमच 80 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांनी टपालाद्वारे मतदान केलं.
