आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात चिदंबरम यांना अटक झाली असून दिल्लीतील विशेष न्यायालयाने आज चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. दरम्यान, चिदंबरम यांच्या विनंतीवरून त्यांना दिवसातून दोनवेळा घरचं जेवण उपलब्ध करून देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीबीआयकडून त्यास कोणतीही हरकत घेण्यात आली नाही.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सीबीआयने ही कारवाई केली होती. आयएनएक्स मीडियाची प्रवर्तक इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास संस्था चिदंबरम यांची कसून चौकशी करत आहेत. ही चौकशी सुरूच असून त्यात चिदंबरम यांच्याविरोधात अनेक ठोस पुरावे हाती लागलेले आहेत. आयएनएक्स मीडिया ग्रुपला २००७ मध्ये ३०५ कोटी इतका विदेशी फंड मिळवून देण्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड या केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील एजन्सीने मंजुरी दिली होती. त्यात अनियमितता आढळून आलेली आहे. ही मंजुरी मिळाली त्यादरम्यान पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. दरम्यान, चिदंबरम यांच्या संमतीने ही सारी प्रक्रिया झाल्याचा आरोप ठेवत सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देश सोडून जाणार नाही!
चिदंबरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जात आपण देश सोडून जाणार नाही, असे नमूद केले आहे. जामीन मिळाल्यास संबंधित प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांची विनंती कोर्टाने फेटाळली.
चार किलो वजन घटलं
७४ वर्षीय चिदंबरम यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आले असून तिथे आपणास घरचं जेवण व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी विनंती त्यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी केलेल्या अर्जात केली आहे. कारागृहात माझी प्रकृती खालावत चालली आहे. तिथल्या जेवणाची मला सवय नाही. तेथील जेवणामुळे माझं वजन ४ किलोने कमी झाले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. पुढील आठवड्यात कोर्ट बंद राहणार असल्याने माझ्या जामीन अर्जावर उद्याच सुनावणी व्हावी, असेही चिदंबरम यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. चिदंबरम यांच्यावतीने कपिल सिब्बल यांनी हा अर्ज केला असून त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई आजच निर्णय देणार आहेत.