महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असून, अहमद पटेल व अन्य राष्ट्रीय नेते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बिगरभाजप काँग्रेस-जनता दल संयुक्त सरकारच्या शपथविधीसाठी सोनिया यांच्यासह मायावती आणि अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित होते. याच धर्तीवर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि छोटय़ा पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विधिमंडळ गटनेतेपदी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. या वेळी १ डिसेंबरला शपथविधी समारंभ होईल, असे जाहीर करण्यात आले होते; पण त्यानंतर १ डिसेंबरऐवजी २८ नोव्हेंबर रोजी शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.
